Friday, 29 January 2021

 

             जि.प.उच्च प्राथमिक शाला कोडेलोहारा

                        केंद्र -वडेगाव

                   पं.स.तिरोडा जि. गोंदिया

 

                             

 

मुख्याध्यापकाचे नाव- श्री.लिलाधर भरतलाल बघेले

                  मो.न. ९७६६४९०९७०

Email-liladharbaghele6224@gmail.com

शाळेचा ब्लॉग kodelohara.blogspot.com & YouTube channel – kodelohara

 

 

 

                          CASE STUDY

                   ( यशोगाथा )

 

(१) शालेय नेतृत्व :-

                  “तुम्हाला किती अनुयायी आहेत.यापेक्षा तुम्ही किती नेतृत्व विकसित केले हे चांगल्या नेत्याचे लक्षण आहे”.

                                           .............महात्मा गांधी

                  वरील उक्ती प्रमाणे, शाळेचा प्रमुख नेता म्हणुन विविध भूमिका व जबाबदारी आपणाकडे असतात.यामध्ये मुख्याध्यापक म्हणुन स्वंविकास ,संघ बांधणी व नेतृत्व, शालेय प्रशासनाचे नेतृत्व,भागिदारिचे नेतृत्व,नवोपक्रमाचे नेतृत्व, अध्ययन-अध्यापन सुधार प्रक्रिया,शालेय नेतृत्व दृष्टिकोन या विविध भूमिकेतून नेतृत्व विकास करणे गरजेचे आहे.

                  शाळेचा कायापालट व शाळा प्रमुखाची चिकित्सक भूमिका यांचा समग्र विकसित  दृष्टिकोन तयार करण्यासाठी वरील सर्व क्षेत्राची सांगड़ घालणे आवश्यक आहे. शाळा ही सर्व विविध क्षेत्र विकासातुन घडणारी संघटित संस्था आहे. यामध्ये काम करणारे  शाळा प्रमुख ते शिक्षक , विद्यार्थी यापर्यंत स्व विकासाची भावना जागृत होणे गरजेचे आहे.यालाच घेउन मुख्याध्यापकाने सकारात्मक दृष्टिकोन स्वंय-कल्पना (स्वंय-प्रतिमा) विकसित  करणे, विविध मुल्यांचा समावेश स्वंयचरित्र आणणे  आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातुन मी आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल करणे सुरु केले. आपले ध्येय ठरवून चहुरंगी शाळा विकास हे कशा पद्धतीने करता येईल यावर मनामध्ये विचारचक्र चालाविने सुरु केले. यामध्ये माझे सहकारी मित्र यांची भूमिकाही तशिच होती.त्यामधे अधिक भर घालून शाळेचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यावर  विचार करू लागलो.याकरिता माझी योजना, माझे परिश्रम , त्यासाठी माझ्या सहकारी वर्गाची साथ मिळवित गेलो. त्यासोबतच  माझ्या सहकारी मित्रांची योजना – त्यांचे परिश्रम. त्यामध्ये माझ्या प्रयत्नाची साथ मी त्याना देत गेलो. त्यामुळे आम्हा सर्वांचे नाते हे परस्पर सहकार्याचे होत गेले.त्यातून शाळा विकासामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम होत गेले.

                  यामध्ये शाळेतील विविध क्षेत्रामध्ये प्रत्येकाला संधी

          त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील हरहुन्नरी शिक्षक श्री. जितेन्द्र  भोंगाळे सर यांनी मी IAS होणार या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी जाणीव जागृती निर्माण करून याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे विद्यार्थी हा स्पर्धात्मक वातावरणात जगतो आणि आपल्या ज्ञानात दिवसेंदिवस भर घालत असतो.

        त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील शिक्षक श्री. दुर्योधन सेंदरे सर  यांच्या Todays प्रदान करुण प्रत्येक क्षेत्रात सर्वांचे योगदान मिळविले व ते क्षेत्र प्रत्येकानी स्वताचे क्षेत्र म्हणुन स्वीकार केले. आणि शाळेमध्ये  परिपाठ ,कला ,साहित्य ,खेळ ,शिस्त या सर्वच क्षेत्रामध्ये शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आपले योगदान दिले. प्रत्येक मुल शिकू शकते ही भावना सर्व शिक्षकामध्ये घातली व त्यामधून प्रत्येकांनी आपआपले प्रयत्न सुरु केले.

     गावातील १००% विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करुन ते शाळेमधे १००% टीकतिल यासाठी प्रयत्न सुरु केले. विद्यार्थी उपस्थिती १००% झाल्यावर अध्यन क्षमता ह्या १००% मुलांमधे याव्यात यासाठी सर्व शिक्षकांनी पायाभूत स्तरावर विद्यार्थ्यांची चाचणी करुण विद्यार्थ्यांमध्ये मुलभुत क्षमता प्राप्त व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेत. पहिल्या तीन महिन्यात वाचन ,लेखन , गणन व गणितीय क्रिया ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या मजबूत केल्या. त्यानंतर शाला विकासाचे पुढचे पाउल म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण केले. आणि विविध उपक्रमाची सुरुवात झाली. प्रत्येक विद्यार्थी नवनवीन उपक्रमात सहभागी होत गेला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी व प्रत्येक शिक्षक हा सर्व उपक्रमात नियमितपणे सहभागी होईल या तत्त्वावर काम केले त्यातूनच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना समान संधी प्राप्त होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मोलाची मदत झाली.

   शाळा विकासात शालेय शिस्त महत्त्वाची मानून आपल्या शाळेची वेगळी संस्कृती विकसित केली. शाळा हे आमचे एक  कुटुंब म्हणून आम्ही मानू लागलो व शाळेतील प्रत्येकाचा सन्मान ठेवून सर्वांगीण शाळा विकास हे एकमेव तत्त्व ठेवून शाळा विकासात सहभागी होत गेलो.

 (2) मुख्याध्यापक व शिक्षकयांचे स्व विकासासाठी केलेले प्रयत्न

    आमच्या शाळेमध्ये सर्व सहकाऱ्यांनी ठरवलेले सर्वांगीण शाळाविकास ह्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सर्वांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल केले. सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून स्वतःची जाणीव करून घेतली. मी स्वतः आत्मनिर्भर झालो तरच समर्थपणे काम करू शकतो. तथा इतरांना समर्थ बनवू शकतो किंवा त्यांच्यामध्ये स्व'ची जाणीव निर्माण करू शकतो या भावनेने माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल घडविण्याकरिता प्रयत्न केले. प्रत्येकाने विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणे घेतली यामध्ये मी स्वतः व माझ्या सहकाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे घेतली यामध्ये प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, जीवनविद्या, नेतृत्व विकास, स्पोकन इंग्लिश, विपश्यना,TAG MOOC Co-ordinator, तंबाखूमुक्ती, बालरक्षण अशा विविध प्रशिक्षणातून सर्व शिक्षकांनी आपले व्यक्तिमत्व विकसनात भर  घातली. यामुळे अनेक कौशल्याधिष्ठित सहकारी शिक्षक संघ मला प्राप्त झाला. माझ्या शिक्षक संघाने शाळा विकसनात मोलाची भूमिका बजावली माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी शाळेच्या विविध बाजू सांभाळून शाळेचा चतुरंगी विकास करण्यास मोलाची साथ दिली.

 

(३) अध्ययन अध्यापनात प्रक्रियेतील बदल त्यांचा परिणाम अध्ययन निष्पत्तीतील वाढ सांख्यिकीय स्पष्टीकरण

    शाळा विकासातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे अध्ययन-अध्यापन सुधार प्रक्रिया, माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सुधारण्यासाठी प्रत्येक मूल शिकू शकतो. या तत्त्वावर सर्व शिक्षकांनी आपला दृष्टिकोन सर्वप्रथम सकारात्मक बनविला त्यामुळे आम्ही अध्ययन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी वार्षिक कार्ययोजना तयार केली. त्यामध्ये सुरूवातीच्या दोन महिने “लेखन सुधार प्रकल्प व मूलभूत वाचन लेखन तसेच गणितीय क्रियांचा सराव”  करून घेतला त्यानंतर प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास जागृत करून विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रक्रियेने अध्यापन करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्या इच्छेनुसार  वर्ग अध्यापन करणे सुरू केले. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन विषयी गोडी निर्माण करून अध्ययन प्रक्रियेला  प्रभावी बनविण्याकरिता प्रयत्न केले. प्रत्येक संकल्पना विद्यार्थ्यांना समजेल यासाठी विविध कौशल्यांचा वापर करून अध्यापन कार्य केले. विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांना मानसन्मान देऊन अध्ययन प्रक्रिया रस निर्माण केला.यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा सकारात्मक भावनेने अध्ययन प्रक्रियेत सहभागी झाला. माझ्या शाळेत मला ओळखले जाते, माझा सन्मान केला जातो, माझ्या भावना जपल्या जातात, या हेतूने प्रभावित होऊन प्रत्येक विद्यार्थी हा अध्ययन प्रक्रियेत सहभागी होऊ लागला. व यामुळे अध्ययन संपादनुक  पातळीत निश्चितपणे वाढ झाली. सन 2018-19 मध्ये प्रगत विद्यार्थी यांचे प्रमाण हे 91 टक्के असून ते प्रमाण सन 2019-20 ला 100 टक्के पर्यंत येऊन पोहोचले. शाळा विकासाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊन शाळेच्या पटसंख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. सन 2018-19 ला 134 विद्यार्थी संख्या तर 2019-20 ला 149 पटसंख्या तर 2020-21 ला 160 पटसंख्या अशाप्रकारे विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

 

(४) शाळा विकासाकरिता लोकसहभाग यामध्ये शालेय व्यवस्थापन समिति ,शिक्षक पालक संघ व पालक यांचा सहभाग

    शाळा विकासात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसहभाग. ग्रामीण भागातील शाळा विकासाचा महत्त्वाचा आधार मानला जातो तो म्हणजे लोकसहभाग. लोकसहभाग  घेण्याकरीता आपण समाजामध्ये किती सहभागी होतो हेही महत्त्वाचे असते. या करीता गावातील प्रत्येक सामाजिक कार्य जसे- विवाह लग्न समारंभ, उत्सव यामध्ये माझ्या सर्व सहकारी मित्र सहभागी होऊन त्यांच्या प्रत्येक कार्यात हातभार लावतात व त्यामुळे गावातील लोकसुद्धा आमचे विचार ऐकून घेऊन आम्ही आखलेल्या विविध योजना, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करीत असतात.आम्ही पालकांच्या प्रत्येक सूचनांचा सन्मान करून शिक्षक-पालक संघद्वारे या सूचना शाळांमध्ये स्विकारन्याची  भूमिका ठेवली जाते. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती आमचे पालक म्हणूनच कार्य करीत असते. आम्ही केलेली प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती पूर्ण  प्रयत्न करते. पालकांचा शाळा विकासामध्ये महत्त्वाचे योगदान लागतो.पालकांच्या विविध सूचनांचा आम्ही आदर करतो व त्यानुसार आमचे ध्येय धोरण ठरवित असतो. शाळेने लोकसहभागातून अनेक विविध साधनसामग्री प्राप्त केलेली आहे. यामध्ये एक वर्ग खोली बांधकाम, प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टीव्ही, परिसरात टाइल्स लावणे, शालेय परिसराची रंगरंगोटी करणे,शौचालय बांधकाम करणे, संरक्षण भिंत बांधकाम करणे, असे अनेक विकास कामे शाळा लोकसहभागातून करत असते. यामध्ये नवे पाऊल म्हणून यावर्षी शाळेने सन 2019-20 मध्ये सर्व इयत्ता 1 ते 7 च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका व कंपास पेटीचे वितरण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया प्रभावीपणे होण्यास मदत झाली आहे. लोकसहभाग द्वारे गावांमध्ये सन 2018-19 मध्ये 1 लक्ष   96 हजार रुपये तर सन 2019-20 मध्ये 2 लक्ष 90 हजार रुपयांची लोकवर्गणी करण्यात आलेली आहे. या लोकवर्गणीतून आमच्या शाळा विकासात मोठी मदत झाली आहे.

 

(५) मुख्याध्यापक ,शिक्षक ,विद्यार्थी यांनी राबविलेले नावोपक्रम

        आमच्या शाळेमध्ये एकूण 57 उपक्रम चालत असून यामध्ये दरवर्षी भर पडत असते. मुख्याध्यापक म्हणून मी दरवर्षी हस्ताक्षर सुधार प्रकल्प उपक्रम हाती घेत असतो.        यामध्ये शाळा प्रारंभीच्या सुरुवातीलाच प्रत्येक विद्यार्थ्याला दोन रेघी वहीचं मोफत वितरण करून सर्वांचे मराठी हस्ताक्षर सुधार, अंकलेखन सुधार,व इंग्रजी वर्णाक्षर लेखनात सुधारणा करण्याचे उपक्रम हाती घेतले जाते. हा उपक्रम सतत दोन महीने राबविला जातो.यामुळे मुलांच्या लेखनात सुधारणा होते व मूलभूत ज्ञानात भर पडत असते.

          त्यानंतर आमच्या शाळेतील  विषय शिक्षक श्री.परमानंद रहांगडाले  सर यांचा My Sunday School  या उपक्रमातून विद्यार्थी नियमित शाळेत येतात व आठवडाभरातील अध्ययनापेक्षा  काहीतरी नवीन वेगळे शिकण्याची संधी उपलब्ध करून देतात. यामध्ये आम्हा सर्व शिक्षकांचे वेग वेगळ्या क्षेत्रातील मित्र रविवारला येऊन मार्गदर्शन करीत असतात आणि त्यामुळे नवनवीन क्षेत्रातील ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना मिळत असते आणि यामधून मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन अधिक शिकण्याची वृत्ती वाढीस लागते.

my new name  या उपक्रमातून विद्यार्थी दररोज आपले  नवीन नाव ठेवतात व त्या आपल्या नवीन नावाविषयी ज्ञानार्जन करीत असतात त्यामुळे विद्यार्थी ज्ञानात भर पडते. आणि नवनवीन वस्तूंची माहिती मिळवित असतात.

             त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री. अरुण बर्वे सर  यांचे  मै शिवाजी या उपक्रमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला नेतृत्व करण्याची संधी मिळते. यामध्ये सभा संचालन, सूत्रसंचालन,विषय विवेचन इत्यादी संधी प्रदान केल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणात वाढ होत असते.

          यानंतर आमच्या शाळेतील शिक्षिका कुमारी वंदना मानकर मॅडम यांचा मी सुंदर होणार या उपक्रमातुन दररोज एका सुंदर विद्यार्थ्याची निवड केली जाते व त्यांना बक्षिस दिले जाते.यमुळे विद्यार्थान्ना नीटनेटके राहण्याची सवय लागते.

 

(६) शैक्षणिक व प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर व संसाधनाचे व्यवस्थापन

                आमच्या शाळेत लोकसहभागातून प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टीव्ही लावण्यात आलेल्या आहेत . तसेच दोन वर्गामध्ये स्मार्ट डिजिटल बोर्ड व प्रोजेक्टर लावण्यात आला आहे. तसेच संगणक प्रयोगशाळा सुद्धा निर्माण केलेली आहे. यामध्ये शैक्षणिक प्रक्रियेमध्ये अध्ययन-अध्यापनात  डिजिटल साधनांचा उपयोग होत असतो. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यात आलेले आहेत. यामुळे मनोरंजक पद्धतीने डिजिटल साधनाद्वारे अध्ययन प्रक्रिया केली जाते. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत रस घेत असतात. त्याचबरोबर शाळेतील प्रशासकीय कामे संगणकाच्या माध्यमातून सहज व जलद गतीने केले जातात. त्यांचा प्रभाव शाळा व्यवस्थापन समिती व सनियंत्रण यंत्रणेवर पडत असतो. शाळेमध्ये दोन प्रोजेक्टर्स असून प्रत्येक इयत्तेला संधी मिळावी म्हणून माझी डिजिटल तासिका हा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येत असून दररोज एक तासिका  प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल क्लास रूम मध्ये दिली जाते. या संसाधन व्यवस्थापनातुन प्रत्येक  इयत्ता, शिक्षक व विद्यार्थी यांना तंत्रज्ञानातून शिक्षणाची संधी मिळते. आमच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री. परमानंद रहांगडाले सर  यांच्या माध्यमातून शाळेचा ब्लॉग, यूट्यूब चैनल, वेबसाइट अशा तांत्रिक सुविधा निर्माण करून त्या वापरासबंधिचे शिक्षक व विद्यार्थी यांना  प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करीत असतो व शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करीत असतात.

   (७) शालेय गुणवत्तेत वाढ होण्यासाठी लाभदायक प्रशिक्षणे

 

                 शालेय गुणवत्तेत वाढ होण्यासाठी लाभदायक प्रशिक्षणात सर्वात प्रभावी प्रशिक्षण म्हणजे निष्ठा वर्कशॉप. यामुळे सर्व शिक्षकांच्या विषय ज्ञानात भर पडून विद्यार्थी विकसनात खूप मदत झाली. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी TAG  प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, जीवनविद्या, विपश्यना, तंबाखूमुक्ती,स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण इत्यादी प्रशिक्षण  घेतलेली आहेत. यामध्ये माझे मागील वर्षी शालेय नेतृत्व विकास प्रशिक्षण झाले आहे. त्यामुळे माझ्या शाळेतील सर्व कौशल्ये विकसित शिक्षकांची योग्य सांगड घालून सर्व शिक्षकांना विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर पडेल या दृष्टीने नियोजन करून अध्ययन प्रक्रिया ही प्रभावीपणे राबविली जाते.

 

(८) जिल्हा, विभाग ,राज्य, राष्ट्रीय स्तरावर यशस्वी उपक्रम, क्रीडाप्रकार , कलाप्रकार, स्पर्धा यात नैपुण्य 

    आमच्या शाळेने  दरवर्षी आपल्या अध्ययन सुधार कार्यक्रमातून व विविध नवोपक्रमातुन   जिल्ह्यात नावलौकिक मिळविला असून अदानी फाउंडेशन च्या वतीने आयोजित आमची शाळा आदर्श शाळा या स्पर्धेत जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस सन 2019 ला प्राप्त केलेले आहे. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छाग्रही  या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत शाळेच्या स्वच्छाग्रही उपक्रमाचे चित्रीकरण विविध वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आले आहे. तसेच राज्यातील उपक्रमशील शाळा म्हणून मिपा औरंगाबाद या शैक्षणिक संस्थेद्वारे शाळेतील विविध उपक्रमांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.  राष्ट्रीय स्तरावरील पोर्टलवर आमच्या शाळेच्या या चित्रीकरणाला स्थान देण्यात आले आहे. हे आमच्या शाळेच्या नव्हे तर गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी सन्मानाची बाब असून आमच्या शाळेचा सन्मान वाढविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नरत  आहोत.

               जि.प.उच्च प्राथमिक शाला कोडेलोहारा                         केंद्र -वडेगाव                    पं.स.तिरोडा जि. गोंदिया   ...